खूप दिवस झाले नुसता घरीच बसून आहे, कुठे बाहेर फिरायलाही गेलो नाही. बाहेर गेलो तर पोलीस आडवतात, घरी बसून कंटाळा आलाय, असेच विचार आज सगळ्यांच्या मनात येत आहेत ना? माहित आहे, मात्र मुंबई, महाराष्ट्र, देश आणि जगात तैनात करण्यात आलेल्या पोलिसांचं म्हणन काही वेगळं आहे. हेच म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई पोलीस दलाने एक व्हिडीओ तयार केला आहे.

प्रत्येक सण, उत्सव, कार्यक्रम, प्रेतयात्रा, घटना, अपघात, खुण, चोरी अशा हजारो कामांमधून मार्ग काढण्यासाठी पोलीस दल तैनात केले जातात, त्यातच भर म्हणजे जगभरात आलेल्या महामारीला तोंड देतानाही पोलीसांनीच पुढाकार घेतलाय. काही ठिकाणी तब्बल 24 तास अनेक पोलीस तैनात करण्यात आले आहे, कारण एकच की लोक घरातून बाहेर पडू नयेत आणि त्यांना कोरोनाची लागण होऊ नये.

हे जरी खरं असलं, तरी पोलिसांनादेखील मन आहे, घर आहे, कुटुंब आहे, मित्रपरिवार आहे. मात्र हे सगळं सोडून ते लॉकडाऊनच्या काळात स्वत: रस्त्यावर उभे राहून सुरक्षा देत आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या अनेकांना कोरोनाचा खतरा आहे, मात्र त्याहून अधीक खतरा पोलीसांना आहे, कारण ते प्रत्येकक्षणी अनेकांच्या संपर्कात येत असतात आणि अनेकांसोबत संवाद साधत असतात, काय माहित त्या हजारो प्रवाशांमधला एक कोणीतरी कोरोनाबाधित असू शकतो. म्हणून त्यांची खंत मांडण्यासाठी मुंबई पोलीस दलाने एक व्हिडीओ तुमच्यासाठी सादर केलाय, तो नक्की पाहा...